भाषा शुद्धतेच्या पलीकडचा संवाद
आजच्या काळात भाषा ही केवळ शब्दांची रचना राहिलेली नाही — ती आपल्या ओळखीचा एक भाग आहे, भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे, आणि मनांतील अंतर मिटवणारा सेतू आहे.
पण हळूहळू एक गोष्ट नजरेआड होत चालली आहे — शुद्ध भाषा.
आज आपण मराठीत इंग्रजी मिसळतो, हिंदीत मराठी झिरपत जाते, आणि बोलताना नकळतच एक मिश्रभाषा तयार होते.
"Meeting आहे", "Project complete करायचं आहे", "थोडं me-time हवंच ना!"
हे वाक्य आज इतकं सामान्य वाटतं, की त्यात शुद्ध भाषा उरली की नाही, याचा विचारच केला जात नाही. पण संवाद – तो मात्र होत राहतो.
का करतो आपण ही भाषेची तडजोड?
कारण आपली शिक्षणपद्धती, करिअर, आणि डिजिटल जग इंग्रजीशी घट्ट जोडलेलं आहे.
कारण लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, तर भाषा समजण्यास सोपी असायला हवी.
आणि कधी कधी शुद्ध भाषा वापरणं कठीण, औपचारिक, किंवा अप्रस्तुत वाटतं.
पण यात मी हरवले का ?
लहानपणापासूनच माझ्या आजूबाजूला अनेक भाषा होत्या — शाळेत इंग्रजी, मराठी, संस्कृत; घरी तेली भाषा; मित्रांसोबत मराठी आणि हिंदी.
मला हे कधी जाणवलंच नाही की मी भाषांच्या मिश्रणाचा भाग बनतेय.
पण जसजशी मोठी झाले, तसतसं मला शब्दांपेक्षा त्याच्या लयी, भावना आणि टोन अधिक भावू लागले.
मी ती मुलगी होते जी एकेकाळी स्पष्ट मराठीसुद्धा नीट बोलू शकत नव्हते.
आणि आज?
मी मराठी, हिंदी, इंग्रजी सहज वापरते — एकमेकांत गुंफलेली, जणू त्या भाषा एकाच मनाच्या तारा आहेत.
आता माझी स्वप्नं फक्त देशापुरती मर्यादित राहिलेली नाहीत — फ्रेंच, स्पॅनिशसारख्या परदेशी भाषा शिकण्याची उत्सुकताही मनात आहे.
म्हणजे काय?
भाषा मला तोडत नाहीत, त्या मला जोडतात.
मग तरीही का हा भाषावाद?
का अजूनही कोणी शुद्ध भाषा न वापरली तर त्याला कमी लेखलं जातं?
का इंग्रजी बोलणाऱ्याला ‘स्टायलिश’ म्हणतात, पण मराठी मिसळणाऱ्याला ‘गैर’?
का आपण एखाद्याच्या संवादाची किंमत फक्त त्याच्या भाषेच्या शुद्धतेवर मोजतो?
भाषा ही साधन आहे — ओळख गमावण्याचं नाही, ओळख जपण्याचं.
शब्द बदलू शकतात, पण भावना मात्र तशीच राहते.
माझं मत?
मी तडजोड करते — हो, करते.
कारण मला वाटतं, संवाद अधिक महत्त्वाचा आहे.
परिपूर्ण व्याकरणापेक्षा मोकळेपणा, ओघ, आणि भावना पोहोचणं आवश्यक आहे.
पण त्याचवेळी, मी माझ्या मुळांशी जोडलेली राहणंही तितकंच महत्त्वाचं मानते.
मी इंग्रजी वापरते, पण मराठी जपते.
मी “message” करते, पण अजूनही "आईगं!" म्हणते.
मी status टाकते, पण अजूनही मनात "काय वाटतंय..." असं काहीसं चालू असतं.
भाषेचा अभिमान आणि संवादाचं स्वातंत्र्य — दोन्हींची नितांत गरज आहे.
निष्कर्ष — शुद्धतेपेक्षा समजून घेणं महत्त्वाचं
भाषा शुद्ध ठेवणं हे आपल्या संस्कृतीशी नातं टिकवण्यासाठी आवश्यक आहे —
पण संवाद मोकळा ठेवणं, समजून घेणं, आणि जोडणं हीसुद्धा तितकीच गरज आहे.
*खूप छान - Kudos !!!*
ReplyDeleteमी ती मुलगी होते जी एकेकाळी स्पष्ट मराठीसुद्धा नीट बोलू शकत नव्हती. — *नव्हती नाही नव्हते* 😂 वाक्यात होती असती तर नव्हती, होते आहे तर नव्हते.
Jokes apart पण खूप छान व्यक्त केलय भाषेमधील मिश्रणाची गोडी.
माझं मत-
मुळात शुद्ध आणि अशुद्ध अशी भाषा नसतीच. कोसा कोसावर भाषा आणि भाषेचा बाज, लहेजा, चाल बदलत जाते. आणि हेच बदल भाषेला जिवंत ही ठेवतात.
बहिणाबाईंची अहिराणी मधली अस्सल खानदेशी लयीची गोड कविता तितकीच सुंदर जितकी गदिमा किंवा शांता शेळक्यांची so called शुद्ध भाषेतली कविता.
मराठीत अनेक परभाषीय शब्द कन्नड, हिंदी, संस्कृत, तमिळ, फारसी, उर्दू ,इंग्लिश मधून आलेलेच आहेतच की हाच भाषेतील बदल मिश्रण भाषा तारतो.
नाही तर आपण अजूनही संस्कृत किंवा प्राकृत मराठी च बोलत असलो असतो.
भाषेवर प्रभुत्व अस असाव की अस्सल पुणेरी माणसाला मस्त शालजोडे देता आले पाहिजे, रस्त्यात कोण आडवा आला तर कडक गावरान शिव्या झाडता आल्या पाहिजे. And well, if anyone call themselves modern, let’s give them the English reply what they deserves.
आपण कितीही वेगवेगळ्या भाषा शिकलो तरी अजूनही स्वप्न आपल्याला मराठीतच पडतात.. नाही का? त्यामुळे मराठीच मूळ अति इंग्राजळलेले शब्द वापरून तरी मराठी माणसाने बिघडवू नये.
हे खरंच अंतर्मनाला स्पर्शून जाणारं लिखाण आहे. भाषेच्या शुद्धतेपेक्षा संवादाची जाणीव आणि मोकळेपणाचं मोल किती असतं, हे तुमचं लिखाण हृदयात खोलवर ठसवतं. अभिनंदन आणि आभार, असंच सातत्याने लिहीत राहा!
ReplyDelete